“एका रात्रीत ६ घरफोड्या! नडगिवेत चोरट्यांचा धुमाकूळ; CCTV मध्ये कैद झाले संशयित”

कणकवली : नडगिवे गावातील धुरीभाटलेवाडीमध्ये एकाच रात्री तब्बल सहा बंद घरांना लक्ष्य करून घरफोडी केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. यात सुमारे १० हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे पेंडंट तसेच चांदीच्या मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांनी डल्ला मारला असल्याचे समजते. याप्रकरणी नडगिवे गावचे पोलीस पाटील जितेंद्र चंद्रकांत मणयार यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या भागातील अनेक घरे वर्षभर बंदच असतात. याच गोष्टीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी ही घरफोडी केली. घरफोडीदरम्यान चोरट्यांनी वाडीतील मोहन सखाराम मणयार, संदीप पांडुरंग मांजरेकर, भास्कर शंकर राणे, रवींद्र वासुदेव मांजरेकर, शंकर सीताराम आंबेकर आणि अमोल सदाशिव मयेकर अशा एकूण ६ नागरिकांच्या बंद घरांना लक्ष्य केले होते.
चोरट्यांनी या सर्व घरांचे मुख्य दरवाजे, गेट तसेच खिडक्यांचे कोयंडे तोडून आत प्रवेश केला होता. कपाटे फोडून सर्व सामान अस्ताव्यस्त फेकून दिले होते. चोरट्यांनी संदीप मांजरेकर यांच्या घरातील रोख १० हजार रुपये, सोन्याचे पेंडंट, तर रवींद्र मांजरेकर यांच्या घराच्या देव्हाऱ्यातील चांदीच्या मौल्यवान वस्तू लांबविल्याचे समजते. मात्र, अन्य घरांचे मालक मुंबईवरून गावात आले नसल्याने, त्यांच्या घरातून नेमकी किती रोकड अथवा मुद्देमाल चोरीला गेला आहे, हे समजू शकलेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातामध्ये ग्लोव्हज घातलेले सुमारे सहा संशयित मध्यरात्री परिसरात वावरताना दिसून आले होते.