अखेर प्रशासन जागे झाले! शिरोडा महामार्गावरील धोकादायक झाडे हटवली

सावंतवाडी : शिरोडा महामार्गावर निरवडे झरबाजार नजीक जुन्या कौल फॅक्टरी समोर रस्त्याच्या दुतर्फा वाळलेली आणि वाहतुकीस धोकादायक ठरणारी आकाशियाची झाडे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवित रस्ता पावसाळ्यात वाहतुकीसाठी सुरळीत केला आहे.
ग्रामस्थांची आणि वाहनधारकांची असलेली मागणी लक्षात घेता बांधकाम विभागाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे. सावंतवाडी शिरोडा महामार्गावर बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली झाडे वाळलेली आहेत. रेल्वे स्टेशन ते निरवडे आरोस तिठा या भागात आकाशियाची झाडे वाळलेली आहेत. गेली दोन-चार वर्ष वाळून जीर्ण झालेली ही झाडे कधीही कोसळण्याच्या स्थितीत होती. वारंवार याकडे लक्ष वेधूनही गेली चार वर्षे ही झाडे तोडण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग कानडोळा करत होता, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी अलीकडेच नव्याने सुरू झालेल्या पूजा इंगवले आणि सावंतवाडी उप अभियंता पदी नव्याने रुजू झालेले अजित पाटील यांच्यापर्यंत या धोकादायक झाडांबाबत माहिती जातात त्यांनी तात्काळ याबाबत दाखवत सदरचे झाडे मुळासकट हटवली आहेत. एकूणच ग्रामस्थ आणि वाहन चालकांच्या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केल्याने समाधान व्यक्त होत आहे. पावसाळ्यात तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर झाडांच्या फांद्या पडून अपघातासारखे प्रकार घडतात शिवाय रस्त्याकडे ला वाढलेली झाडीही अपघाताला कारणीभूत ठरते तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या गोष्टीकडे लक्ष देऊन ही कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे असे मागणीही आता यानिमित्ताने जोर धरू लागली आहे.