कुडाळ : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य येत्या ७ सप्टेंबरला कुडाळच्या विशेष दौऱ्यावर येत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, महाविद्यालयांमधील अडचणी आणि पायाभूत सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी सिनेट सदस्य विद्यार्थी, प्राध्यापक व महाविद्यालयीन व्यवस्थापनाशी थेट संवाद साधणार आहेत. नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या पुढाकारातून या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्यात विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. यामध्ये परीक्षा निकालांना होणारा विलंब, पुनर्मूल्यांकनाचे प्रश्न, हॉल तिकीट व गुणपत्रिकांमधील चुका यांसारख्या शैक्षणिक अडचणींवर विद्यार्थी आणि युवा संघटनांचे प्रतिनिधी आपली मते मांडणार आहेत.
त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचा प्रश्नही या वेळी चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे. उपकेंद्राची रखडलेली कामे, उपलब्ध सुविधांमधील त्रुटी आणि स्थानिक विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या सेवा प्रभावीपणे मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली जाईल. याशिवाय नवीन शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अंमलबजावणीतील अडचणी व क्रेडिट सिस्टीमचाही आढावा घेतला जाणार असून, विविध संघटनांना आपली प्रलंबित निवेदने सिनेट सदस्यांना सादर करता येणार आहेत.
कुडाळ व परिसरातील ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी संबंधित काही समस्या किंवा प्रलंबित प्रश्न असतील, त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेवक मंदार शिरसाट यांनी केले आहे.












