‘निरूखेचे मूलभूत प्रश्न आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून सुटणार!’ – दत्ता सामंत

निरूखे-पांग्रडच्या मूलभूत प्रश्नांसाठी आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून प्रयत्न; शिवसेनेकडून २०० जणांना मोफत एनसीएमसी कार्डांचे वाटप

कुडाळ/ निरूखे :

निरूखे-पांग्रड गावातील मूलभूत प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितच सोडवले जातील. प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच शिवसेनेचे ध्येय असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले.

शिवसेनेच्या वतीने कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या सौजन्याने निरूखे ग्रामपंचायत हॉल येथे एसटी बस प्रवासासाठी सवलतीचे एनसीएमसी कार्ड वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत निरूखे गावातील तब्बल २०० नागरिकांना मोफत एनसीएमसी कार्डांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, सरपंच कीर्तिकुमार तेर्से, उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक, कुडाळ शहर प्रमुख अभिषेक गावडे, श्रमिक कामगार कल्याणकारी संघटनेचे राज्याध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना दत्ता सामंत यांनी हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. प्राजक्त चव्हाण यांनी सेवाभावी वृत्तीने गावातील गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करून हे शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.

दत्ता सामंत म्हणाले की, जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा आणि तळमळीने समाजासाठी काम करणारा कार्यकर्ता हा जनतेचा विश्वास संपादन करतो. प्राजक्त चव्हाण यांचे कार्य पाहता भविष्यात गावाच्या नेतृत्वासाठी जनतेचा त्यांना निश्चितच पाठिंबा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तर दादा साईल यांनी ग्रामीण भागातील जनतेसाठी एसटी ही जीवनवाहिनी असल्याचे सांगितले. एसटीच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या दीड वर्षात कुडाळ आणि मालवण परिसरात जवळपास २५ एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून, आता सवलतीचे एनसीएमसी कार्डही नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे दादा साईल यांनी सांगितले. या कार्डासाठी आकारले जाणारे २०० रुपयांचे नोंदणी शुल्क पूर्णपणे मोफत करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दादा साईल यांनी पुढे सांगितले की, आमदार निलेश राणे गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. निरूखे गावात विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, खासदार नारायण राणे, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.

यावेळी प्राजक्त चव्हाण यांच्यासारख्या स्थानिक युवकांनी पुढाकार घेऊन विविध शासकीय आणि लोकाभिमुख योजना ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, तसेच भविष्यातही अशा प्रकारचे कॅम्प आयोजित करून नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत पेंडुरकर यांनी केले.

निरूखे येथे शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या सौजन्याने आयोजित मोफत एनसीएमसी कार्ड वाटप कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.