आजरा येथे मंगळवारी ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ ग्रंथावर चर्चासत्र
ॲड. देवदत्त परुळेकर लिखित प्रभा प्रकाशन प्रकाशित ग्रंथ
संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : श्री राम कृष्ण हरी वारकरी संप्रदाय संस्था, आजरा यांच्या वतीने ह.भ.प. देवदत्त परुळेकर लिखित कणकवली प्रभा प्रकाशन प्रकाशित ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ ग्रंथावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी दु. १२ वा. आजरा येथील जनता सहकारी बँकेच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात नामवंत समीक्षक तथा शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख मुख्य मांडणी करणार आहेत तर
मुकुंददादा देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या चर्चासत्राला प्रा. सुनील शिंत्रे, सुभाष विभुते यांना वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. तर यावेळी ग्रंथलेखक ह.भ.प. देवदत्त परुळेकर आणि सदर ग्रंथाचे प्रकाश तथा कवी अजय कांडर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
‘आजच्या काळासाठी तुकोबा’ हा ग्रंथ संत तुकाराम महाराजांचे विचार आणि कार्य आजच्या काळाच्या संदर्भात कसे उपयुक्त आहे, यावर प्रकाश टाकतो. वारकरी संप्रदायातील विचारांना आधुनिक काळात नव्याने मांडण्याचा हा प्रयत्न असल्याने या चर्चासत्राला विशेष महत्त्व आहे.
अल्प कालावधीत आजच्या काळासाठी तुकोबा हा ग्रंथ लोकप्रिय झाला असून पुढील काही दिवसात या ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. समाज समाशील बनण्यात संत तुकारामांचे विचार महत्त्वाचे आहेत. आजच्या काळात अशा विचाराची अतिशय गरज असून हेच विचार परुळेकर यांनी या ग्रंथातून मांडले आहेत. या महत्त्वाच्या ग्रंथावर अलीकडेच बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे सेवांगणच्या सभागृहात ज्येष्ठ लेखक राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली आणि संत साहित्याचे अभ्यासक नंदकुमार मोरे, प्राचार्य गोविंद काजरेकर आणि प्रा संजीवनी पाटील यांच्या सहभागाने एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता आजरा येथे या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तरी श्री राम कृष्ण हरी वारकरी संप्रदाय संस्थेने सर्व वारकरी, साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.












