आचर्‍यात मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर; ग्रामस्थांचे निवेदन

आचरा : मोकाट गुरांचा प्रश्न आचरा गावात भेडसावत आहे. याबाबत तात्काळ बंदोबस्त करुन केलेल्या कारवाईची माहिती देण्याची मागणी रुपेश टेमकर यांनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामविकास अधिकारी माधुरी कामतेकर यांच्याकडे केली आहे. यावेळी रुपेश मंगेश टेमकर यांच्यासोबत गणेश पाटकर, दर्पण आचरेकर, गौरव पेडणेकर आदी उपस्थित होते.
या निवेदनात नमूद आहे, आचरा येथील मुख्य रस्ते व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे फिरत आहेत. यामुळे वाहतुकीस गंभीर अडथळा होत आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचे छोटे-मोठे अपघात होत असतात. भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी आचरा ग्रामपंचायत येथे लेखी अर्ज सादर करण्यात आला होता. त्यावर ग्रामसभेत गुरे मालकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला होता. अद्यापही मोकाट गुरांचा त्रास कमी झाला नाही. तथापि, या अर्जावर कोणती कार्यवाही करण्यात आली, याबाबत लेखी माहिती मिळावी. भविष्यात अपघात झाले, तर त्याची जबाबदारी कोणाची राहील हेही स्पष्ट करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे