कणकवली : 28 डिसेंबर 2021 रोजी फोंडाघाटातील खोल दरीत एका अज्ञात इसमाचा विल्हेवाट लावलेल्या स्थितीतील मृतदेह घाट परिसरात सेल्फीसाठी थांबलेल्या काही युवकांना दिसून आला होता. त्याच्याच बाजूला एक मोटरसायकलही आढळून आल्याने प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे वाटले होते. मात्र, पाच वर्षांनी या घटनेचा छडा लागला असून तो अपघात नव्हता तर आर्थिक वादातून अश्पाक मुलाणी उर्फ निहाल (रा. माळशिरस, जि. सोलापूर) याचा खून त्याच्या मित्रांनीच करून मृतदेह व त्याची मोटरसायकल फोंडाघाटातील दरीत फेकून रस्ते अपघाताचा बनाव करत त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे उघड झाले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा मुंबई कक्ष 07 च्या पोलीसांनी हा खून उघडकीस आणत त्यातील 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे. कणकवली पोलिस या आरोपींना मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले असून कणकवली पोलीसांच्या तपासात या घटनेबाबत अधिक उलगडा होणार आहे.
कणकवली पोलिसांनी हा मृतदेह व मोटरसायकल फोंडा घाटात आढळून आल्यानंतर या प्रकरणी अपघात आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी भादवि 304 अ नुसार गुन्हा दाखल करत तपास थांबवला होता. मात्र आता पाच वर्षानंतर गुन्हे शाखा मुंबईच्या पोलिसांना गोपनिय माहिती प्राप्त झाल्यानंतर हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. घाटकोपर गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आत्माजी सावंत यांना एका व्यक्तीने या खुनाबाबत गोपनीय माहिती दिली.
पोलीसांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीसांनी मानवी कौशल्य वापरून संशयित आरोपींची चौकशी केली. त्यात अश्पाक याच्यासोबत झालेल्या पैशाच्या देवाणघेणीच्या वादातून त्यांनी आपसात संगनमत करून कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये मयत अश्पाक याला बोलावून मध्यरात्रीच्या सुमारास संशयीत मनोज भडगे, सुरेंद्र सोनवडेकर, अतिष मोरे, अमित राऊत, अनिल भंडारी आणि ऋतुराज शेट्टी यांनी त्याला जबर मारहाण करून ठार मारले. त्यानंतर त्याचा मृतदेह आणि मोटरसायकल पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फोंडा घाटातील नदीत फेकून रस्ते अपघाताचा बनाव केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली. यातील मनोज भडगे, सुरेंद्र सोनवडेकर, अतिष मोरे आणि ऋतुराज शेट्टी याचार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींनी अश्पाक याचा खून करून तो मोटरसायकलवरून जाताना अपघात झाल्याचा बनाव रचून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबूली दिली आहे. या आरोपींना पुढील तपासाकरीता कणकवली पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त गुन्हे अनिल कुंभारे, अप्पर पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घाटकोपरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आत्माजी सावंत, एपीआय सुहास खरमाटे, महिला एपीआय वैशाली सरवदे, एपीआय रामदास कदम, धनाजी साठे, महेश शेलार, स्वप्नील काळे, पीएसआय परबळकर, अरूण सावंत यांच्या पथकांनी केली.
दरम्यान या गुन्ह्यातील आरोपींचे दोन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तपासात या आरोपीनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर गुन्हे शाखेने या आरोपींचा ताबा कणकवली पोलिसांना दिला असून कणकवली पोलीस या आरोपींकडे अधिक तपास करत आहेत.












