कर्जतमध्ये मोठी कारवाई! कागदपत्रे नसल्याने प्रसिद्ध ठाकरे हॉटेल सील

नेरळः राज्यात अन्नसुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू असताना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक तपासणी मोहीम राबविली. या कारवाईदरम्यान आवश्यक नोंदणी प्रमाणपत्रे व कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे आढळून आल्याने कर्जत शहरातील प्रसिद्ध ठाकरे हॉटेल बंद करण्यात आले.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कर्जत परिसरातील हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्रेते आणि व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६ नुसार प्रत्येक अन्न व्यवसायिकाकडे वैध नोंदणी अथवा परवाना, स्वच्छतेचे निकष आणि आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. तपासणीदरम्यान ठाकरे हॉटेलकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित आस्थापनावर कारवाई करण्यात आली.
याच मोहिमेत कर्जत शहरातील आमराई रस्त्यालगत असलेल्या कृष्णा स्वीट मार्ट येथेही पथकाने अचानक भेट देत खाद्यपदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेतले. संबंधित कागदपत्रांची छाननी करण्यात आली असून प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यात गुटखा विक्रीविरोधातही मोठी कारवाई करण्यात आली होती. विविध टपऱ्यांवर धाडी टाकून मोठा गुटखा साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.