कुडाळमध्ये हृदयद्रावक घटना; २२ वर्षीय युवकाचा नदीत बुडून मृत्यू

कुडाळ : कविलकाटे परिसरातून वाहणाऱ्या भंगसाळ नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. वैभव नितीन बांदेकर (रा. बाजारपेठ, कुडाळ) असे या मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण कुडाळ शहरावर शोककळा पसरली आहे.
वैभव बांदेकर हा आपल्या चार मित्रांसह दुपारच्या वेळी कविलकाटे येथील भंगसाळ नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. सुरुवातीला सर्व मित्र नदीत उतरून पोहत होते, मात्र काही वेळातच अचानक नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगवान झाला. प्रवाहाचा वाढता वेग पाहून सर्व मित्र घाबरले आणि त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला. वैभवचे तीन मित्र कसेबसे प्रयत्न करून सुरक्षितपणे नदीबाहेर पडले, मात्र वैभवला पाण्याच्या प्रबळ प्रवाहाचा प्रतिकार करता आला नाही. पाण्याच्या ओघात तो खोल पाण्यात ओढला गेला आणि बेपत्ता झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरुणांच्या मदतीने तातडीने शोधकार्य सुरू करण्यात आले. सुमारे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर वैभवचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश आले. मृत वैभवच्या पश्चात आई, वडील आणि चुलत बहीण असा परिवार आहे. ऐन तारुण्यात वैभवचा अशा प्रकारे अंत झाल्याने बांदेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.