सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर

सिंधुदुर्ग : जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांना त्यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक (Medal for Meritorious Service) जाहीर करण्यात आले आहे. देशपातळीवर दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिस दलासह सर्व स्तरांतून समाधान आणि अभिमान व्यक्त केला जात आहे.

डॉ. मोहन दहिकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे तसेच पोलिस दलात शिस्त आणि कार्यक्षमता वाढविण्यावर विशेष भर दिला. संवेदनशील प्रकरणांमध्ये त्यांनी दाखवलेली तत्परता, निर्णयक्षमता आणि प्रशासकीय कौशल्य यामुळे जिल्हा पोलिस यंत्रणा अधिक सक्षम झाली.

गुन्हे उघडकीस आणण्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सायबर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रीत करणे, महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी राबवलेले उपक्रम तसेच जनतेशी सुसंवाद साधणारी पोलिसिंग ही त्यांच्या कार्यशैलीची ठळक वैशिष्ट्ये ठरली. आपत्ती व्यवस्थापन, कायदा-सुव्यवस्थेच्या आव्हानात्मक परिस्थिती आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या नियोजनातही त्यांनी प्रभावी नेतृत्व केले.

राष्ट्रपती पदक जाहीर होणे हे त्यांच्या वैयक्तिक कामगिरीसोबतच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. या सन्मानाबद्दल जिल्ह्यातील विविध सामाजिक, प्रशासकीय व नागरिकांकडून डॉ. दहिकर यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सेवाकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोकणशाही सिंधुदुर्ग