सावंतवाडी : सिंधुदुर्गवासियांचे १९९४ पासूनचे बहुप्रतिक्षित स्वप्न अखेर पूर्णत्वास येत असून जिल्ह्यातील शिरोडा-
वेळागर येथे आलिशान ताज हॉटेल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रालयात इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि स्थानिक जमीनदारांच्या प्रतिनिधींमध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह आयएचसीएलचे व्यवस्थापकीय संचालक पुनीत छटवाल आणि एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे उपस्थित होते.
शिरोडा-वेळागर येथील हा प्रकल्प कोकणच्या नैसर्गिक सौंदर्याला साजेसा असा जागतिक दर्जाचा लक्झरी प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला मोठी गती मिळणार असून स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच शेतकरी, स्थानिक कारागीर, वाहतूक व्यावसायिक आणि गाईड्स यांच्या व्यवसायालाही मोठी चालना मिळेल.
पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा टप्पा गाठणे शक्य झाले असून, ताजच्या आगमनामुळे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे ओळखला जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या करारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.












