एसटी महामंडळाकडून काही महिन्यांपूर्वीच राजमाता जिजाऊ बससेवा सुरू करण्यात आली. आता कोकणासाठी दिलेल्या 15 नव्या बसगाड्यांवरून वाद निर्माण झाला आहे. तीन वेगवेगळ्या आगारांसाठी आलेल्या बसेस रत्नागिरीला देण्यात आल्या आहेत.
चिपळूण : कोकणातील दापोली हा महत्त्वाचा पर्यटन तालुका असतानाही, दापोली, मंडणगड आणि खेड एसटी आगारासाठी आलेल्या एकूण १५ जिजाऊ बसगाड्या अचानक रत्नागिरी येथे पाठवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवासीवर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गृहराज्यमंत्री आमदार योगेश कदम यांच्याच मतदारसंघातील दापोली, खेड आणि मंडणगड या एसटी डेपोवर अवलंबून असलेल्या प्रवाशांवर हा अन्याय झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शुक्रवारी रात्री या बस वरील तिन्ही आगारांत दाखल झाल्या होत्या, मात्र शनिवारी सायंकाळी उशिरा तातडीने त्या पुन्हा रत्नागिरीला मागवून घेण्यात आल्या.
दापोली, मंडणगड आणि खेड आगारांना देण्यात आलेल्या बसेस इतर आगारांकडे वर्ग करण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. या प्रकरणात एसटीचे अधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली येऊन राजकारण करत आहेत, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख ऋषी गुजर यांनी केला आहे. या अन्यायाविरोधात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘एकीकडे परिवहनमंत्री ‘डिझेल वाचवा’ असा संदेश देत असताना, तिन्ही आगारांतून रिकाम्या बसगाड्या शनिवारी सायंकाळी रत्नागिरीकडे का रवाना करण्यात आल्या? तसेच, या गाड्यांवर स्थानिक आगारांचे ‘डेपो मार्किंग’ झाले असतानाही, ‘बस आगारात आल्याच नव्हत्या’ असा कांगावा एसटी अधिकारी का करत आहेत? हे नक्की कोणते राजकारण सुरू आहे?’ असा प्रश्न गुजर यांनी उपस्थित केला.
आगारातून उंबरघर-ठाणे, सध्या दापोली पाजपंढरी-मुंबई, दाभोळ-बोरीवली, दाभोळ-नालासोपारा, भडवळे-नालासोपारा अशा मार्गांवर एसटीची प्रचंड मागणी आहे. सध्या ई-शिवाई बसगाड्या दापोलीतून ठाणे आणि बोरीवली मार्गावर सोडल्या जात आहेत. त्यामुळे नवीन बस आल्या असत्या, तर या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असता, मात्र राजकीय घडामोडींमुळे खोडा घातल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
पर्यटक, प्रवाशांची गैरसोय
‘या नवीन जिजाऊ बस मिळाल्या असत्या, तर मुंबई, पुणे, ठाणे, बोरिवली या मार्गांवर नवीन फेऱ्या सुरू करता आल्या असत्या. यामुळे पर्यटक आणि प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध झाली असती. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील या अंतर्गत राजकारणामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे,’ अशी प्रतिक्रिया प्रवासी सचिन सावंत यांनी दिली.












