मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पोलादपूर अपघातात पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाल्यानंतर आता अनिल मरकड यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या भीषण दुर्घटनेत मात्र 8 वर्षांचा चिन्मय आई-वडिला-बहिणीविना पोरका झाला आहे.
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर येथील भीषण अपघाताने मरकड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघातात पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाल्यानंतर मृत्यूशी झुंज देणारे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक नियंत्रक अनिल मरकड यांचेही मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. या दुर्घटनेमुळे आठ वर्षांच्या चिन्मयच्या डोक्यावरून आई-वडील दोघांचेही छत्र हरपले आहे.
पत्नीच्या बाराव्याच्या आदल्या दिवशी पतीचाही मृत्यू
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर येथील भीषण अपघातातील आणखी एका जखमीचा मृत्यू झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात सहाय्यक नियंत्रक म्हणून कार्यरत असलेले अनिल मरकड यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांचे निधन झाले.
या अपघातात अनिल मरकड यांची पत्नी सुवर्णा मरकड आणि मुलगी अनुश्री यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर अनिल मरकड गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर गेल्या दहा-बारा दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही.
8 वर्षांचा चिन्मय झाला पोरका
या भीषण दुर्घटनेत मरकड दाम्पत्याचा आठ वर्षांचा मुलगा चिन्मय सुदैवाने बचावला. मात्र एका अपघातात आई, बहीण आणि आता वडिलांनाही गमावल्याने त्याच्या डोक्यावरून मातृ-पितृछत्र हरपले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सुट्टीहून परतताना झाला अपघात
मे महिन्याच्या सुट्टीनिमित्त मरकड कुटुंब मूळ गावी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे गेले होते. सुट्टी संपल्यानंतर दापोलीकडे परतत असताना 30 मे रोजी दुपारच्या सुमारास पोलादपूर येथे त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.
या अपघातात सुवर्णा मरकड आणि मुलगी अनुश्री यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिल मरकड गंभीर जखमी झाले होते. विशेष म्हणजे पत्नीच्या बाराव्या विधीच्या आदल्या दिवशीच अनिल यांचे निधन झाल्याने कुटुंबीयांवर आणखी मोठा आघात झाला आहे.
कृषी विद्यापीठातील लोकप्रिय अधिकारी
अनिल मरकड हे 2007 मध्ये कृषी विद्यापीठात सहाय्यक अधीक्षक म्हणून रुजू झाले होते. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना पुढे सहाय्यक नियंत्रक पदावर बढती मिळाली होती. उच्च पदावर कार्यरत असूनही त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू आणि हसतमुख होता. त्यामुळे विद्यापीठातील सहकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये ते लोकप्रिय होते.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
अनिल मरकड यांचे वडील रावसाहेब मरकड हे पाथर्डी तालुक्यातील रुघ्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. आधी सून, नात आणि आता मुलाच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
बुधवारी तिसगाव येथे अनिल मरकड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे कृषी विद्यापीठ परिवारासह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.












