“कोकणचा अभिमान! सहावीच्या पाठ्यपुस्तकात मालवणी भाषेला मानाचे स्थान”

कणकवली : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) नव्या पाठ्यपुस्तकांमध्येही राज्यातील बोलीभाषांना स्थान दिले आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार तयार केलेल्या इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकांत मालवणी, वन्हाडी या बोलीभाषांचा समावेश असून, अकरावी-बारावीच्या स्तरावरही पाठ्यपुस्तकातील बोलीभाषांचा विस्तार करण्याचे ‘बालभारती’च्या विचाराधीन आहे.

बालभारतीतर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, सहावी या इयत्तांची नवी पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. १५ जूनपासून राज्यातील शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, सहावीच्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके लागू होणार आहेत.

पाठ्यपुस्तकातील बोलीभाषांच्या समावेशाबाबत ‘बालभारती’च्या मराठी विषयाच्या विशेषाधिकारी सविता वायाळ यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘जुन्या अभ्यासक्रमानुसार पहिली ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांतही बोलीभाषांतील कविता, पाठांचा समावेश होता. या संकल्पनेला शिक्षक, तज्ज्ञांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नव्या अभ्यासक्रमानुसार तयार केलेल्या पाठ्यपुस्तकांतही राज्यातील बोलीभाषा समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. सहावीच्या नव्या पाठ्यपुस्तकात मालवणी, वन्हाडी या बोलीभाषा समाविष्ट केल्या आहेत. त्यात त्या बोलीभाषांतील एक उतारा, लेखक परिचय देण्यात आला आहे.
पुढील वर्षी येणार ‘या’ इयत्तांची नवी पुस्तके
नव्या अभ्यासक्रमानुसार पहिली ते दहावी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांत बोलीभाषांचा समावेश केला जाणार आहे. तसेच, अकरावी-बारावीच्या पाठ्यपुस्तकांतही बोलीभाषांच्या समावेशाचा विचार सुरू आहे. पुढील वर्षी पाचवी, सातवी, नववी, अकरावी या इयत्तांची नवी पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहेत.