वेंगुर्ले : तुळस व मातोंड गावांना जोडणाऱ्या नदीवर तुळस पलतड येथे असलेला आणि परिसरातील शेतीसाठी जीवनवाहिनी ठरलेला ‘ब्रिज कम बंधारा’ रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक मधोमध कोसळला. बंधारा थेट मधूनच फुटल्यामुळे नदीतील पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाला असून, यामुळे आगामी रब्बी हंगाम पूर्णपणे धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. या धक्कादायक घटनेमुळे तुळस आणि मातोंड परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, पुढील रब्बी हंगामापूर्वी येथे नवा बंधारा उभारण्यात यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
तुळस येथील या महत्त्वपूर्ण बंधाऱ्यामूळे अडवलेल्या पाण्यावर तुळस आणि मातोंड भागातील शेतकरी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर शेती करतात. येथील शेतकरी या बंधाऱ्याच्या पाण्याच्या जोरावर भुईमूख, नाचणी, मिरची, चवळी यांसह विविध प्रकारची आंतरपिके आणि भाजीपाला घेत असतात. तुळस भागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येत विशेष पुढाकार घेऊन यापूर्वी या बंधाऱ्याला मंजुरी मिळवून घेतली होती. मात्र, आता हा बंधाराच कोसळल्यामुळे प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता, रब्बी पिकाच्या पेरणीपूर्वी या कामात तात्काळ लक्ष घालणे गरजेचे झाले आहे.
हे काम लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येत असून या कामाला मंजुरी मिळाली असल्याचे सांगितले जात आहे, परंतु याचे कोणतेही अधिकृत पत्र अजूनपर्यंत तुळस ग्रामपंचायतीला प्राप्त झालेले नाही. या पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय यांनी प्रशासनाला विनंती वजा इशारा दिला आहे की, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हे काम युद्धपातळीवर हाती घेऊन तातडीने पूर्ण करण्यात यावे. दरम्यान, तुळस गावचे सुपुत्र आणि पंचायत समितीचे सभापती शंकर घारे यांनी स्वतः विशेष लक्ष घालून या नूतन बंधाऱ्याचे काम वेळेत पूर्ण करून घ्यावे, अशी आग्रही मागणी आता संपूर्ण गावातून केली जात आहे.












