सिंधुदुर्गनगरी : कोकणात मान्सून दाखल होऊन दोन दिवस झाले, तरी पावसाला जोर नाही. मात्र पुढील दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ९ जून रोजी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सिंधुदुर्गात मान्सून सक्रिय झाला आहे. मात्र, एल निनोच्या प्रभावामुळे जोर नाही. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात १८.८१ मि. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे – वैभववाडी : ७८ मि. मी. सर्वाधिक पाऊस, देवगड ३६ मि. मी., कुडाळ : १२ मि. मी., वेंगुर्ले : १० मि. मी.. दोडामार्ग : १० मि. मी., सावंतवाडी: २.५ मि. मी., मालवण: ०१ मि. मी., कणकवली : ०१ मि. मी
हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकणात मान्सून पुढे सरकत आहे. ९ जूनला जिल्ह्यात ९५ टक्के पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस व ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. १० जूनलाही वादळी पावसाचा जोर राहणार आहे. हवामान विभाग आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना केवळ सुरुवातीच्या पावसावर अवलंबून राहून लगेच पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. कारण १५ जूनपर्यंत पाऊस विखुरलेल्या स्वरुपात राहण्याची शक्यता आहे.












