⚡ सावडाव धबधब्यावर तुफान राडा! कर्मचाऱ्यांना मारहाण, ग्रामस्थांवर दगडफेक, एक पर्यटक ताब्यात

कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा येथे पर्यटन कराच्या मुद्द्यावरून दाजीपूर आणि इचलकरंजी येथून आलेल्या पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठा वाद झाला. ही घटना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. सावडाव ग्रामपंचायतीकडून धबधब्याकडे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागे दहा रुपये पर्यटन कर घेतला जातो. याच कराच्या वसुलीवरून १० ते १२ पर्यटकांनी तिथल्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला आणि त्यांना बेदम मारहाण केली.
मारहाणीचा हा प्रकार पाहून जेव्हा स्थानिक ग्रामस्थ तिथे जमा झाले, तेव्हा पर्यटकांनी त्यांच्यावरही दगडफेक केली. जसजसे अधिक ग्रामस्थ तिथे गोळा होऊ लागले, ते पाहून पर्यटकांनी आपल्या वाहनांसह मुंबई-गोवा महामार्गाच्या दिशेने पळ काढला. मात्र, या घटनेत गावक-यांनी एका पर्यटकाला जागीच पकडले आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्या पर्यटकाला ताब्यात घेतले असून, मारहाण करणाऱ्या सर्व पर्यटकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कणकवली पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. पर्यटनाच्या नावाखाली येऊन स्थानिकांवर दादागिरी करणाऱ्या अशा हुल्लडबाजांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सावडाव ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.