सावंतवाडी : जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मतदारसंघाच्या सीमांचे बंधन न मानणारे नेतृत्व म्हणून आमदार निलेश राणे यांची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. सांगली जिल्ह्यातील हणमंतवडिये येथील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित असलेला एस.टी. बसथांब्याचा प्रश्न तब्बल तीन वर्षांपासून प्रलंबित होता. या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता, तर
पालकांमध्येही सतत चिंतेचे वातावरण होते. ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने अखेर हा विषय आमदार निलेश राणे यांच्यापर्यंत पोहोचला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधत प्रभावी पाठपुरावा केला. त्यांच्या हस्तक्षेपामुळे अवघ्या काही दिवसांत हणमंतवडिये येथील एस. टी. बसथांबा पुन्हा मूळ जागेवर स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा मार्ग मोकळा झाला असून पालकांमधील चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. ग्रामस्थांनीही या निर्णयाचे स्वागत करत आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, हा केवळ बसथांबा स्थलांतरित करण्याचा निर्णय नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याची, पालकांच्या विश्वासाची आणि समाजहिताची जपणूक करणारा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. विशेष म्हणजे, स्वतःच्या मतदारसंघाबाहेरील जनतेच्या प्रश्नासाठी पुढाकार घेत न्याय मिळवून देण्याची भूमिका आमदार निलेश राणे यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीची साक्ष देणारी ठरली आहे.
जनतेचे प्रश्न, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि विकासकामे यांना सर्वोच्च प्राधान्य देत राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारे नेतृत्व म्हणून आमदार निलेश राणे यांचे कार्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हणमंतवडिये ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या या तत्पर हस्तक्षेपाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे.












