भरती प्रक्रियेत कोकणवासीयांना धक्का; मुलाखतींचे ठिकाण ठरले वादाचे कारण

चिपळूण : कोकण रेल्वेच्या १३२ पदांच्या भरती प्रक्रियेसाठीच्या मुलाखती चक्क आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाच्या या अजब आणि अनपेक्षित निर्णयाला कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीने तीव्र विरोध दर्शविला आहे. समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी याबाबत तीव्र नाराजी (Konkan Railway 132 posts recruitment controversy) व्यक्त करत, हा निर्णय कोकणातील स्थानिक बेरोजगार तरुणांवर उघड अन्याय करणारा असल्याचा थेट आरोप केला आहे.

कोकण रेल्वेने १४ मे २०२६ रोजी या भरतीबाबतचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकानुसार, भरतीसाठीच्या प्रत्यक्ष (ऑफलाईन) मुलाखती ८ जूनपासून विशाखापट्टणम येथे सुरू होत आहेत. भरती कोकण रेल्वेची आणि उमेदवारांच्या हक्काची असताना, या मुलाखती महाराष्ट्राबाहेर आंध्र प्रदेशात घेण्यामागचे नेमके कारण काय?, असा संतप्त सवाल शौकत मुकादम यांनी प्रशासनाला विचारला आहे.

समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम पुढे म्हणाले, कोकण रेल्वेची ही भरती प्रक्रिया मुख्यतः महाराष्ट्र, गोवा आणि संपूर्ण कोकण पट्ट्याशी संबंधित आहे. असे असताना केवळ मुलाखतीसाठी उमेदवारांना हजारो किलोमीटर दूर आंध्र प्रदेशात बोलावणे अत्यंत गैरसोयीचे आणि अन्यायकारक आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या स्थानिक बेरोजगार युवकांना लांब पल्ल्याच्या प्रवासाचा मानसिक त्रास आणि मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.

स्थानिक केंद्रांवर मुलाखती घेण्याची मागणी
कोकण रेल्वे भरतीच्या या मुलाखती विशाखापट्टणम ऐवजी पूर्वीप्रमाणेच मुंबई, बेलापूर, मडगाव (गोवा) आणि रत्नागिरी या स्थानिक केंद्रांवर तातडीने घेण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीने केली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने स्थानिक तरुणांच्या भावनांचा विचार करून हा निर्णय बदलावा, अन्यथा कोकणातील भूमिपुत्र आणि बेरोजगार युवकांच्या न्याय्य हक्कासाठी तीव्र लढा सुरू ठेवला जाईल, असा इशारा शौकत मुकादम यांनी दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत कोकणातील तरुणांवर अन्याय होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.