फिटनेसची रविवारी धमाकेदार सुरुवात! सावंतवाडीत ‘संडे ऑन सायकल’ अभियानाला भरघोस प्रतिसाद

सावंतवाडी : भारत सरकारच्या’फिट इंडिया मिशन’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘संडे ऑन सायकल’ अभियानाला सावंतवाडीत प्रतिसाद लाभला. पंचायत समितीतर्फे आयोजित या उपक्रमात सायकलिंग व धावण्याद्वारे नागरिकांना तंदुरुस्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. या अभियानाची सुरुवात तालुका स्कूल क्रमांक १ येथून सभापती सुस्मिता जाधव यांनी हिरवा झेंडा दाखवून झाली. त्यानंतर सहभागी नागरिकांनी मोती तलावमार्गे श्रीमंत बापूसाहेब महाराजांच्या पुतळ्यापर्यंत सुमारे दोन किलोमीटर अंतर सायकलिंग व धावून पूर्ण केले.
कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, गटविकास अधिकारी नीलेश जाधव, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, उपअभियंता (लघुपाटबंधारे) जुवेकर, गटशिक्षण अधिकारी शेर्लेकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी छाया घाडीगावकर, विनायक पिंगुळकर, जितेंद्र सावंत. शुभदा सावंत तसेच पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या रॅलीत सावंतवाडी येथील मराठा करिअर अकादमीचे सुमारे १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी व उपस्थित नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत नियमित व्यायाम, सायकलिंग व आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला