सिंधुदुर्गसह 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा!

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. हवामान विभागाने याबाबत अधिकृतपणे घोषणा केली आहे. तळकोकणात पावसाने रात्री किनारपट्टी भागात जोरदार हजेरी लावली. सकाळी जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाच्या मध्यम सरी बरसल्या. सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला. सध्या जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून काळे ढग दाटले आहेत. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर तळकोकणात मान्सूनचे आगमन होते. मात्र या वर्षी दोन दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

आता 25 जिल्ह्यांना वेधशाळेने पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अकोलासह अन्य 25 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. 6 जून ते 9 जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. राज्यात काही जागी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूननं संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी 15 जून उजाडणार आहे.

पुढील 25 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट?
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशीव, बीड, लातूर, परभणी, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, कोल्हापूर.

9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.