मुंबई-गोवा वंदे भारतला ब्रेक! आता दररोज नाही, आठवड्यात फक्त 3 दिवस धावणार

कोकण रेल्वेवर वंदे भारत ट्रेनची मागणी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. यातच फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. कारण जाणून घ्या…

  • मान्सून सुरू होत असल्यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक आधीपासूनच नियोजन करून ठेवतात. पावसाळी सहली काढतात. गोवा हे पर्यटकांचे खास आकर्षण असलेले ठिकाण. पावसाळ्यात गोव्यात जाण्यासाठी कोकण रेल्वेचा मार्ग अगदी वेगळा अनुभव देणारा ठरतो.
  • कोकण रेल्वे मार्गावर अधिक मागणी असलेली ट्रेन म्हणजे वंदे भारत एक्स्प्रेस. वंदे भारत ट्रेनने प्रवास करण्याकडे प्रवाशांचा अधिक कल असतो. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई गोवा वंदे भारत ट्रेन २० कोचची करावी अशी मागणी केली जात आहे.
  • कोकणात जायचे म्हणजे तिकीट मिळत नसल्याचा अनुभव बहुतांश प्रवासी घेत असतात. यातच दररोज धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या फेऱ्या कमी केल्या जात आहेत. मुंबई गोवा वंदे भारत ट्रेन आता दररोज धावणार नसल्याचे समोर येत आहे. ही ट्रेन आता आठवड्यातून तीन दिवस सुरू असेल.
  • कोकण रेल्वे मार्गावर १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत मान्सून वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. या कालावधीत रेल्वेगाड्यांचा वेग मंदावतो. बहुतांश रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल होतो. याचा सर्वाधिक फटका अतिजलद ट्रेनना बसतो.

वंदे भारत एक्स्प्रेसलाही कोकण रेल्वेवरील मान्सून वेळापत्रकाचा फटका बसला आहे. आठवड्यातून सहा वेळा धावणारी वंदे भारत आता मान्सून वेळापत्रकानुसार फक्त तीन दिवस धावेल.
कोकण रेल्वेच्या मान्सून वेळापत्रकामुळे जून ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई ते गोवा वंदे भारतच्या शंभरहून अधिक फेऱ्या रद्द होणार असल्याचे म्हटले जात आहे. कोकणात जाणाऱ्यांची संख्या गणेशोत्सव काळात सर्वाधिक असते. तसेच पावसाळ्यात मुंबई ते गोवा दरम्यानचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक वंदे भारतचा प्रवास निवडतात.
धो-धो पाऊस पडत असताना, दृश्यमानता कमी होते. यासाठी लोको कोकण मार्गावरील ट्रेनच्या लोको पायलट यांनाही महत्त्वाच्या सूचना करण्यात येतात. कोकण रेल्वेच्या मान्सून वेळापत्रकानुसार, जून ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई ते गोवा मार्गावरील वंदे भारत ट्रेन आता आठवड्यातील तीन दिवस चालवली जाणार आहे. गाडी क्रमांक २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे ५.२५ वाजता सीएसएमटीवरून सुटेल आणि मडगाव येथे दुपारी ४.०० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक २२२३० मडगाववरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि रात्री १०.३० वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल. मुंबई ते गोवा या मार्गावर वंदे भारत ट्रेनचे तिकीट एसी चेअर कारसाठी १८४५ रुपये आहे. तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी ३३९० रुपये एवढा तिकीट दर आहे. वंदे भारत ट्रेनची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. वंदे भारत ट्रेनसह जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, वांद्रे मडगाव एक्स्प्रेस अशा अनेक ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे. मान्सूनसाठी कोकण रेल्वेवर गती धीमी होत असल्यामुळे सदर बदल करण्यात आलेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कोकण रेल्वे मार्गावरील अनेक ट्रेन विलंबाने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. वंदे भारत ट्रेन भारतीय रेल्वेची प्रिमियम ट्रेन असल्यामुळे शक्यतो या ट्रेनला मोठा उशीर होत नाही. यात आता पावसाळी वेळापत्रक लागू झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनचा वेग मंदावतो.