“EL NINO संकटावर मात; केसरीत शेतकऱ्यांसाठी जागरूकता शिवार फेरी”

आजच्या बदलत्या हवामान परिस्थितीत शेतकऱ्यांनी सावध आणि सजग राहणे गरजेचे बनले आहे… आणि याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरी गावात खरीप हंगाम २०२६ अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


आज दिनांक १२ मे २०२६ रोजी मौजे केसरी येथे कृषि विभागाच्या वतीने EL NINO जागरूकता शिवार फेरी कार्यक्रम, जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक, संवाद सेतू तसेच बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी मंडळ कृषि अधिकारी मा. श्री. विजय गंबरे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना EL NINO मुळे हवामानात होणारे बदल, संभाव्य परिणाम आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच नैसर्गिक शेतीचे महत्त्व आणि कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी आवश्यक बाबींवरही त्यांनी माहिती दिली.

उप कृषि अधिकारी श्री. व्ही. के. पाटील यांनी बीजप्रक्रिया आणि बियाणे उगवण चाचणीचे प्रात्यक्षिक दाखवत शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादनासाठी योग्य बीज प्रक्रिया किती महत्त्वाची आहे हे समजावून सांगितले.

तसेच सहाय्यक कृषि अधिकारी टी. सी. राणे यांनी कृषि विभागाच्या विविध शासकीय योजना, अनुदाने आणि शेतकऱ्यांना उपलब्ध सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाला केसरी गावातील तब्बल ५२ शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत नैसर्गिक शेती आणि हवामान बदलाशी संबंधित माहिती जाणून घेतली.