देवगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकेवरील खलाशी दीपक जोहन कुल्लू (४४, मूळ रा. ओडीसा, सध्या रा. देवगड जेटी) याची अचानक तब्येत बिघडल्याने त्याला देवगड जेटी येथे आणण्यात आले. तेथून त्याला देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना १२ मे रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक कुल्लू हा देवगड येथील अशोक चंद्रकांत सारंग यांच्या ‘ओंकारेश्वरी” या नौकेवर खलाशी म्हणून कामाला होता. ही नौका देवगड समुद्रात मासेमारीसाठी गेली असता १२ रोजी पहाटेच्या सुमारास खलाशी दीपक कुल्लू याच्या छातीत व पोटात दुखू लागले. त्यामुळे त्याला तात्काळ देवगड जेटी येथे आणण्यात आले. यावेळी त्याची कोणतीही हालचाल दिसून येत नव्हती. त्याला तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची फिर्याद रोशन पीटर कुल्लू (२३, मूळ रा. ओडीसा, सध्या रा. देवगड जेटी) याने देवगड पोलीस स्थानकात दिली. या फिर्यादीनुसार घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. घटनेचा तपास देवगडचे पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत करीत आहेत.












