सावंतवाडीला मोठी भेट; ५ कोटींचे भव्य क्रीडा संकुल मंजूर!

सावंतवाडी : शहरातील क्रीडा सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून तब्बल ५ कोटी रुपये खर्चुन आधुनिक क्रीडा संकुल मंजूर करण्यात आले आहे. याठिकाणी इनडोअर आणि आऊटडोअर अशा दोन्ही प्रकारच्या खेळांच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय अतिरिक्त ७ कोटींची तरतूदही मंजूर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या क्रीडा संकुलात सेमी ऑलिम्पिक धावपट्टीसह विविध इनडोअर खेळांच्या सुविधा उभारण्यात येणार असून आज संबंधित जागेची पाहणीही करण्यात आली. वेंगुर्ला येथे देखील क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त जागेची मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. अॅथलेटिक्सच्या सर्व सुविधा एकाच मैदानावर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. सावंतवाडीत क्रिकेटसह सर्व मैदानी खेळांसाठी दर्जेदार सुविधा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रमाकांत आचरेकर सरांच्या नावाने ड्रेसिंग रूम उभारण्यात आली असून स्विमिंग पूल सुरू करण्यासाठी नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले आणि क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर प्रयत्नशील आहेत, असेही केसरकर यांनी सांगितले. बांदा आणि दोडामार्ग येथेही क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असून सावंतवाडीतील बहुतांश सुविधा पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सावंतवाडी नगरपालिकेस कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती देत लवकरच नियुक्ती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील नळपाणी योजना आणि गॅस पाइपलाइन कामांमुळे नागरिकांना काही प्रमाणात गैरसोय होत असली तरी ही कामे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे सांगत, विकासकामांत राजकारण येऊ नये ही आपली भूमिका असल्याचे केसरकर यांनी ठामपणे स्पष्ट केले. “आरोप करण्यापासून मी अलिप्त असतो. चूक असेल तर टीका व्हावी, पण विकासकामे अडवली जाऊ नयेत,” असे ते म्हणाले. येत्या आठवड्यात नळपाणी योजना आणि नगरपालिकेच्या विविध कामांचा आढावा घेण्यात येणार असून दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांना एकत्र बसवून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षातील कथित व्हायरल ऑडिओबाबत विचारले असता, “मी तो ऑडिओ ऐकलेला नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे उचित ठरणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. वाळू उत्खननाबाबत बोलताना त्यांनी परवानगीशिवाय उत्खनन शक्य नसल्याचे सांगितले. तसेच दगडी खाणीवरील मारहाणीची घटना चुकीची असून त्याची चौकशी करून भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रशासनाला सूचना देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खाणींमुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत विचारले असता, “तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र ते शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागतच करू,” असे केसरकर यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात महायुती कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.