सिंधुदुर्गनगरीने घेतला मोकळा श्वास ! पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा आदर्शवत दरबार

साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग : लोकप्रतिनिधी कसा असावा याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे आहेत. पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्यावर एवढा गुलाल उधळण्याची कारणही तितकेच लक्षवेधी आहे. आढावा बैठकांमध्ये बोलताना ‘माझ्या जिल्ह्याचे नाव कुठल्याही गीष्टीमुळे खराब झालेलं मी खपवून घेणार नाही’ अशी रोखठोक भूमिका घेणारे पालकमंत्री नितेश राणे यांनी खरतर आपल्या या वक्तव्याची सुरुवात स्वतःच कृतीतून करून दिली आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त १३२ पेक्षा अधिक आंदोलने सिंधुदुर्गनगरी येथे होणार होती. पण प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदरच या सर्व आंदोलनकर्त्यांना निमंत्रित करून प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यात सुसंवाद घडवून आणण्याचे महत्वपूर्ण काम पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले. त्यामुळे पूर्वसंध्येलाच असंख्य उपोषण, आंदोलने स्थगित झाली. म्हणूनच या प्रजासत्ताक दिनी सिंधदुर्गनगरीने मोकळा श्वास घेतला असल्याचे चित्र सर्वाना पाहायला मिळाले.

स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन यांसारखे ऐतिहासिक दिवस सद्यस्थितीत आपल्या न्याय मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन, उपोषण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत असतानाचे चित्र सर्वच ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरंतर या दिवसांना नागरिकांवर आंदोलन करण्याची वेळच येऊ नये ही भूमिका ना. नितेश राणे याना ‘क्लिक’ झाली असावी आणि त्यातून आपल्या ३ टर्मच्या कार्यकाळात विविध नवनवीन संकल्पना राबविण्यात यशस्वी ठरलेले ना. नितेश राणे यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आलेल्या भारतीय प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्गनगरीला आंदोलनातून मोकळा श्वास घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित बैठकीला जे काही आंदोलनकर्ते काही कारणास्तव पोहचु शकले नव्हते त्यांची आज प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्गनगरी येथे ना. नितेश राणे यांनी प्रत्यक्ष भेट त्यांचेही प्रश्न सोडविण्यासाठी आपण व प्रशासन तप्तर असल्याचा शब्द दिला आहे. दिलेला शब्द पाळण्यात ना. नितेश राणे हे नेहमीच ठाम असतात हा आजपर्यंतचा देवगड – कणकवली – वैभववाडी या विधानसभा मतदारसंघातील जनतेने अनुभवलेला विश्वास आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता अनुभवणार आहे. सर्व आंदोलनकर्त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एकत्र आणून त्यांच्या समस्या जाणून घेण्याची अभिनव व सक्षम लोकशाहीसाठी आवश्यक असलेली आदर्शवत संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणल्याने ना. नितेश राणे यांचे सर्वत्र कौतुकही होत आहे.