पालक मंत्री नितेश राणे यांच्या आश्वासनानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे…

वेंगुर्ले आगारातील वाहतूक निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांचा मनमानी कारभार वेळोवेळी आगार व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून सुध्दा त्यांनी कोणतीही दखल न घेतल्याने सेवा शक्ति संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या आगार कार्यकारणीने रविवारी (दि.२६) उपोषण छेडले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आणि याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी तहसिलदार, पोलीस निरिक्षक व आगार व्यवस्थापक यांच्यासमवेत झालेल्या चर्चेनुसार चौकशी अहवाल दोन दिवसात आगारातून वरिष्ठ कार्यालयास पाठविण्याची कार्यवाही करण्यात येईल. येत्या सात दिवसात संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी यावेळी सांगितले. यानंतर वेंगुर्ले आगार सेवा शक्ति संघर्ष एसटी कर्मचारी संघाने दुपारी उपोषण मागे घेतले.