पुणे : सर्वसामान्यांच्या खिशाला आता दुधाच्या दरवाढीचा फटका बसणार आहे. अमूल आणि मदर डेअरीच्या दूध विक्रीच्या दरवाढीनंतर राज्यातील सर्वच सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघाने म्हशी आणि गायीच्या दूध विक्रीत चार रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दुग्धजन्य पदार्थाच्या दरातही १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. सोमवार (दि. १६) पासून ही दरवाढ लागू होणार आहे.
यासंदर्भात शुक्रवारी (दि. १३) कात्रज डेअरी येथे संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक झाली. या बैठकीला राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांचे ४५ ते ५० पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
डिझेलच्या दरातील वाढ, वाहतूक खर्च, साखरेचे वाढलेले दर, पैकिंग साहित्य आणि मनुष्यबळावरील खर्चात झालेली वाढ यामुळे दूध विक्री दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातच दूध उत्पादकांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दुधाचे दरही वाढले आहेत. आगामी काळात दूध खरेदी दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने विक्री दरात वाढ करणे आवश्यक असल्याचे संघाकडून स्पष्ट करण्यात आले.












