साईभक्तांसाठी खुशखबर! श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मागणी वर मोपा – शिर्डी थेट विमान सेवेसाठी खा. नारायण राणे यांचा पुढाकार

मोपा-शिर्डी थेट विमानसेवेसाठी खा. नारायण राणेंचा पुढाकार

श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवली यांनी केली मागणी

कणकवली : गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच उत्तर कर्नाटक परिसरातील साईभक्तांसाठी महत्त्वाची ठरणारी मोपा (गोवा) – शिर्डी थेट विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीला आता मोठी चालना मिळाली आहे. श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवलीच्या वतीने या मागणीसाठी खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायणरावजी राणे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विशाल कामत, सेक्रेटरी राजन परब आणि ट्रस्टी गणेश काटकर यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन मोपा विमानतळावरून शिर्डीसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली.

गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि उत्तर कर्नाटक परिसरातून दरवर्षी मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डी येथे दर्शनासाठी जातात. मात्र सध्या रस्ते अथवा रेल्वे मार्गाने शिर्डी गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ लागत असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच दिव्यांग भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मोपा विमानतळावरून शिर्डीसाठी थेट विमानसेवा सुरू झाल्यास हा प्रवास अवघ्या काही तासांवर येण्याची शक्यता आहे.

यामुळे सिंधुदुर्गासह गोवा, रत्नागिरी आणि उत्तर कर्नाटकातील धार्मिक पर्यटनाला देखील मोठी चालना मिळू शकते. स्थानिक हॉटेल व्यवसाय, वाहतूक व्यवस्था, पर्यटन क्षेत्र आणि इतर व्यावसायिकांना त्याचा थेट फायदा होण्याची शक्यता आहे.

या मागणीचे गांभीर्य लक्षात घेत खासदार नारायण राणे यांनी आपण स्वतः या विषयाचा पाठपुरावा करून मोपा (गोवा) – शिर्डी थेट विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना दिले. तसेच भाविकांना मोफत शिर्डी विमानसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.

श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या या मागणीला खासदार नारायण राणे यांचा पाठिंबा मिळाल्याने साईभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ही विमानसेवा प्रत्यक्षात सुरू झाल्यास सिंधुदुर्ग आणि परिसरातील साईभक्तांसाठी शिर्डी दर्शनाचा प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर होणार आहे. खा. नारायण राणेंच्या पाठपुराव्यामुळे ही सेवा किती लवकर सुरू होते, याकडे सिंधुदुर्गासह गोवा व परिसरातील साईभक्तांचे लक्ष लागले आहे.