संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कणकवली येथे उभारण्यात आलेल्या नवीन बीपीएचयू इमारत, उपजिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कणकवली येथील बीपीएचयू इमारत, उपजिल्हा रुग्णालय आवार येथे दुपारी २.३० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश नारायण राणे यांच्या शुभहस्ते नवीन बीपीएचयू इमारत, उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद कामत, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
नवीन बीपीएचयू इमारत, उपजिल्हा रुग्णालयामुळे कणकवली तालुक्यातील नागरिकांना उपचारांसाठी अधिक चांगल्या आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी होणारी गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे कणकवली परिसरातील आरोग्य सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडणार असून, नागरिकांसाठी आधुनिक रुग्णालय सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.












