आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अनुदानाची प्रतीक्षा ;

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL |

✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग

सिंधुदुर्ग ; दि . १५

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना शासनाने सुरु केली आहे. मात्र आंतरजातीय विवाह केलेल्या काही जोडप्यांना गेल्या तीन वर्षांपासून हे अनुदान न मिळाल्याने ही जोडपी जि. प. समाज कल्याण विभागात चकरा मारत आहेत. जिल्ह्यातील अशी 90 जोडपी या प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास शासनाकडून 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाते. परंतु, गेल्या तीन वर्षात आंतरजातीय विवाह केलेल्या जिल्ह्यातील 90 जोडप्यांना नोंदणी करूनही त्यांना अद्याप हे अनुदान मिळालेले नाही. जिल्ह्यात सन 2021-22 या आर्थिक वर्षात अर्ज केलेल्या लाभार्थीना या योजनेचा लाभ मिळाला. मात्र त्यानंतर (सन 2022-23 ते 2024-2025) या तीन वर्षात अश्या लाभार्थीना या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. यातील काही जोडपी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात चकरा मारत असल्याचे चित्र आहे.
शासनाने समाजातील अस्पृश्यता निवारण करण्याचा एक भाग म्हणून राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सन 1958 पासून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन म्हणून हे आर्थिक साहाय्य केले जाते. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, बौद्ध विशेष मागासप्रवर्ग यापैकी एका व्यक्तीने सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन व शीख व्यक्तीशी विवाह केल्यास अथवा दोन वेगवेगळ्या प्रवर्गातील विवाहित जोडप्यांना लग्न केल्यास त्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन मिळते. या योजनेच्या लाभासाठी संबधित जोडप्याला जातीचा दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे शिफारस पत्र, लग्नाचा फोटो आदी कागदपत्रांसह जि. प. समाज कल्याण विभागकडे नोंद करावी लागते. गेल्या तीन वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंतर जातीय विवाह केलेल्या 90 जोडप्यांनी आपल्या विवाहाची नोंद जि. प. समाज कल्याण विभागाकडे केली आहे. मात्र त्यांना अद्याप हे अनुदान अदा करण्यात आलेले नाही. यामुळे या जोडप्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.