मालवण शहरातील बांगीवाडा येथील इमारतीवर सेंटरींगचे काम करत असताना सेफ्टी बेल्ट निसटल्याने रोहित कुमार चौधरी (वय-२८) रा. मध्यप्रदेश हा आठव्या मजल्यावरून जमीनीवर कोसळून जागीच मृत्यू झाला. याबाबत येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
बांगीवाडा येथील लीलाधर सारंग यांच्या इमारतीमध्ये आज सकाळी ९ वाजता सेंटरिंगचे काम सुरु होते. यावेळी रोहित चौधरी याच्या समवेत विश्राम चौधरी मनोज चौधरी भागवत प्रसाद विश्वकर्म असे सात कामगार काम करत होते. मात्र रोहित कुमार चौधरी याने बांधलेला सेफ्टी बेल्ट काम करत असताना सुटला आणि तो आठव्या मजल्यावरुन खाली कोसळला. त्याला त्याच्या अन्य कामगारांनी मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास टेंबुलकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.









