रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (२४ मे) रात्री झालेल्या भीषण अपघातात चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, होमगार्ड कर्मचारी कुणाल आग्रे हे पत्नी आणि चार वर्षीय मुलीसह रविवारी रात्री प्रवास करत होते. रात्री सुमारे १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास वालोपे परिसरातून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने त्यांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. वाहनातील चार वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला, तर कुणाल आग्रे आणि त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.












