सावंतवाडी : पूर्ण प्रवासी क्षमतेने गेली कित्येक वर्षे सुरू असलेली सावंतवाडी आंबोली मार्गे पुणे निगडी बस फेरी अचानक सावंतवाडी आगाराकडून बंद केल्याने प्रवासाची मोठी गैरसोय झाली आहे. सावंतवाडी आगारातून सायंकाळी सहा नंतर या मार्गावर बस नाही. त्यामुळे या मार्गावर सायंकाळी प्रवाशांनी फूल असणारी एकमेव बस रद्द केल्याने महामंडळाचे नक्की काय चालले आहे? बस सेवा ही प्रवाशांसाठी आहे का? अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारासाठी आहे हा प्रश्न ऊपस्थित केला जात आहे. बस सेवा बंद असून ही ऑनलाईन बुकिंग सुरू आहे.
आंबोली मार्गे सावंतवाडी आगाराची सावंतवाडी निगडी ही बस गेले कित्येक वर्षे सुरु आहे. या सायंकाळच्या बसला प्रवाशांचा भरपूर प्रतिसाद आहे. सायंकाळी आंबोली मार्गे पुणे बस असल्याने बस चुकलेल्याना ही बस फायदेशीर असते. ही बस सावंतवाडी आगारातून सायंकाळी पावणे सातला सुटून पुणे निगडी येथे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास निगडी येथे पोहोचते त्यामुळे रात्रभर बसमध्ये झोपून सकाळी कामावर जाता येते. त्यामुळे या बस मध्ये प्रवाशांची गर्दी असते. परंतु अचानक ही बस रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे ही बस सेवा लवकरात लवकर सुरु करून प्रवाशांचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.
शिवशाही नको, प्रवाशांची लालपरीला पसंती. सावंतवाडी आगारातून सायंकाळी पावणे सात वाजता सुटणारी सावंतवाडी निगडी पुणे ही जुनी झालेली एकमेव शिवशाही बस ही पावसात गळते सीट वर पावसाचे पाणी गळत असल्याने प्रवाशांचे बसण्याचे हाल होतात. त्यामुळे बुकींग फूल असले तर सीट अॅडजेस्ट करण्यासाठी बस वाहकाला तारेवरची कसरत करावी लागते. तसेच यातील ए.सी. कधी सुरू असतो कधी बंद असतो त्यामुळे प्रवाशी चालक आणि वाहकांशी हुज्जत घालतात तसेच ए.सी. बंद झाला की पॅक बंद बसमध्ये गुदमरायला होते. तसेच ती कोठे बंद पडेल याची शाश्वती नाही. तरी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेत सदर बस फेरी पूर्ववत सुरू करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरू लागली आहे.












