‘भव्य मोटारसायकल रॅली’तून देणार एकजुटीचा संदेश;
विकास, रोजगार आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांना पाठिंबा
देवगड : देवगड तालुक्यातील जामसंडे येथे रोजगार, विकास आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या समर्थनार्थ तरुणाई एकवटणार आहे. ‘भव्य मोटारसायकल रॅली’च्या माध्यमातून कोकणातील युवकांनी रोजगार, स्वच्छ ऊर्जा, हरित विकास आणि स्थानिकांना रोजगार या मागण्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही रॅली रविवार, ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता दीर्बा देवी स्टॉप, जामसंडे येथून आयोजित करण्यात आली आहे.
कोकणातील विकास आणि स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, या उद्देशाने देवगड तालुक्यात तरुणाईकडून स्वयंस्फूर्तीने या मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीतून “एकजूट हाच विकासाचा खरा मार्ग” हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक प्रकल्प, स्वच्छ ऊर्जा, हरित कोकण, समृद्ध कोकण आणि स्थानिक युवकांना रोजगार अशा मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. तसेच, “फिरायला कोकणात यायचं, मग नोकरीला कोकणाच्या बाहेर का जायचं?” असा प्रश्न उपस्थित करत स्थानिकांसाठी रोजगारनिर्मितीची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. आयोजकांच्या आवाहनानुसार, कोकणात विकास आणि रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रोजगार, विकास आणि पर्यावरण या मुद्द्यांवर आयोजित करण्यात आलेल्या या मोटारसायकल रॅली उपक्रमातून पुढे कोणते ठोस निर्णय किंवा मागण्या समोर येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.












