केवळ विरोध नाही… अभ्यासपूर्ण हरकती!
साईनाथ गांवकर/ कोकणशाही, कुडाळ
कुडाळ शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर अनेकांकडून प्रतिक्रिया उमटत असताना, नगरसेवक अभिषेक दत्तात्रय गावडे यांनी मात्र केवळ विरोध न करता अभ्यासपूर्ण आणि तथ्याधारित हरकती नगरपंचायतीकडे सादर केल्या आहेत. ब्ल्यू लाईन, रेड लाईन, रस्त्यांचे आरक्षण, ड्रेनेज, पाणीपुरवठा, पार्किंग, पारंपरिक वहाळ आणि सार्वजनिक सुविधांपासून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध विषयांवर त्यांनी सविस्तर सूचना मांडल्या आहेत. त्यांच्या या अभ्यासू भूमिकेचीच माहिती देणारा हा रिपोर्ट
कुडाळ शहराच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ अंतर्गत सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नगरसेवक अभिषेक दत्तात्रय गावडे यांनी नागरिकांच्या वतीने सखोल अभ्यास करून अनेक महत्त्वपूर्ण हरकती सादर केल्या आहेत.
सर्वप्रथम त्यांनी हरकती नोंदविण्यासाठी देण्यात आलेली मुदत अपुरी असल्याचे नमूद करत, नागरिकांना आराखड्याचा अभ्यास करण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे.
यानंतर त्यांनी शहरातील ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन संदर्भातील नियोजनावर आक्षेप घेतला आहे. गेल्या अनेक दशकांत ज्या भागात पूरस्थिती निर्माण झालेली नाही, त्या ठिकाणी पूररेषा दर्शविण्यात आल्यास नागरिकांच्या मालमत्तेचे आणि शहराच्या विकासाचे मोठे नुकसान होईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करून पूररेषांचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शहरातील काही भागात ग्रीन झोन दाखविल्यामुळे भविष्यात नागरिकांना घरदुरुस्ती किंवा पुनर्बांधणीस अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वास्तव परिस्थितीनुसार ग्रीन झोनमध्ये आवश्यक बदल करण्याची सूचना त्यांनी केली आहे.
दाट वस्ती क्षेत्राबाबत देखील त्यांनी वस्तुस्थिती मांडली आहे. सन १९९६ नंतर शहराची लोकसंख्या आणि वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून, काही नव्या भागांचाही दाट वस्ती क्षेत्रात समावेश करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
याशिवाय कुडाळ शहरातील पारंपरिक वहाळ आणि नैसर्गिक पावसाच्या पाण्याचे मार्ग विकास आराखड्यात पूर्णपणे दर्शविलेले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे. हे मार्ग बंद झाल्यास भविष्यात पूरस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
रस्त्यांच्या आरक्षणाबाबत त्यांनी सर्वाधिक अभ्यासपूर्ण सूचना केल्या आहेत. अनेक ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते प्रस्तावित करण्यात आल्याने नागरिकांच्या घरांवर, व्यवसायांवर आणि मालमत्तांवर परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कुडाळ बस डेपो ते अभिमन्यू हॉटेल, आंबेडकरनगर, कविलकाटे, नाबरवाडी, एम.आय.डी.सी. रोड, पोलिस स्टेशन परिसर, स्मशानभूमी प्लाझा, ग्रामीण रुग्णालय, कुडाळेश्वर मंदिर ते हिंदू कॉलनी अशा विविध भागांतील रस्त्यांची रुंदी वास्तव परिस्थितीनुसार कमी करण्याच्या सूचना त्यांनी सविस्तर मांडल्या आहेत.
याशिवाय वाढत्या लोकसंख्येचा विचार करून स्वतंत्र ड्रेनेज स्कीम (STP Plant), भविष्यातील पाणीपुरवठा योजना, तसेच शहरात मोठ्या पार्किंग सुविधेसाठी जागा आरक्षित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
नगरसेवक अभिषेक गावडे यांनी आपल्या हरकतींमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, विकास आराखडा हा नागरिकांच्या हिताचा असावा. अनावश्यक आरक्षणामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान होणार असेल, तर अशा निर्णयांचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे.
“माझा कोणत्याही विकासाला विरोध नाही. मात्र विकास करताना तो वास्तव परिस्थिती, नागरिकांचे हित आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊनच झाला पाहिजे. म्हणूनच मी प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करून या सूचना आणि हरकती सादर केल्या आहेत. प्रशासनाने त्यांचा सकारात्मक विचार करावा, हीच अपेक्षा आहे. असं मत अभिषेक गावडे यांनी कोकणशाही सोबत बोलताना व्यक्त केले.
कुडाळच्या प्रारूप विकास आराखड्यावर केवळ टीका न करता, प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करून पर्यायी सूचना मांडणारे नगरसेवक अभिषेक गावडे यांचे हे निवेदन सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रशासन या हरकतींचा कितपत विचार करते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.












