घर बंद असल्याची संधी साधली; ३ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांच्या ताब्यात

दोडामार्ग : साटेली-भेडशी वरचा बाजार येथे अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ३ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
साटेली-भेडशी येथील आशेसाव शालू रॉड्रिग्स यांच्या भावाच्या घरात ही चोरी झाली. त्यांचे भाऊ रोमाल शिलोरियान फर्नाडिस हे
कामानिमित्त गोवा राज्यात असतात. त्यामुळे त्यांचे घर बऱ्याचदा बंद असते. आशेसाव या लगतच्या घरात झोपण्यासाठी गेल्या होत्या. रविवारी रात्रीच्या सुमारास घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटामधील सुमारे २ लाख ५२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ५५ हजार रुपये तसेच परफ्युमच्या बाटल्याही चोरल्या. ही घटना सोमवारी सकाळी आशेसाव. शालू रॉड्रिग्स घराकडे आल्या असता निदर्शनास आली. त्यानंतर या घटनेची फिर्याद आशेसाव यांनी पोलिसांत दिली.
साटेली-भेडशी हे मोठ्या बाजारपेठेचे केंद्र आहे. त्यामुळे या ठिकाणी लोकांची मोठी वर्दळ असते. यामध्ये अनेक अनोळखी,
परप्रांतीय लोक फिरताना आढळतात. यांची पोलिसांकडून चौकशी करणे आवश्यक आहे. घटनेनंतर दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होत रितसर पंचनामा केला. तसेच श्वान पथक, फॉरेन्सिक टीम दाखल होत तपास केला. तसेच आजूबाजूला असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे अधिक तपास दोडामार्ग पोलीस करीत आहेत.
जे दागिने चोरीला गेले ते दागिने रोमाल फर्नांडिस यांच्या लग्नासाठी आणलेले होते. पुढील काही दिवसांनी त्यांचे लग्न होते.