डॉल्फिन शिल्पाने खुलला कुडाळचा चेहरा; कुडाळ नगरपंचायतीचा नवा षटकार ठरला सेल्फी पॉइंट!

कुडाळ-एमआयडीसी रस्त्यावरील, शहरातील मुख्य चौक असलेल्या एस. एन. देसाई चौकात आधुनिक स्वरुपाचे डॉल्फिन शिल्प उभारण्यात आले आहे. एमआयडीसी प्रशासनाची ना हरकत घेऊन कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून हे डॉल्फिन शिल्प असलेला कारंजा उभारण्यात आला आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी हा अनोखा उपक्रम राबविला आहे

कुडाळ शहरातील एमआयडीसी रस्त्यावरील मुख्य चौक असलेल्या एस. एन. देसाई चौकात हे आकर्षक डॉल्फिन शिल्प उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी डॉल्फिनची लहान व मोठी अशी दोन शिल्पे आहेत. लहान शिल्प हे अंदाजे साडेचार फुटाचे व मोठे शिल्प हे दहा फुटाचे आहे. तसेच त्याठिकाणी कोरीव नक्षीकामही करण्यात आले आहे. डॉल्फिन शिल्पाच्या खालील काही भाग गोलाकार बनविण्यात आंला आहे. त्यात शॉवरचे पाणी पडते. रात्रीच्यावेळी हे शॉवरचे पाणी विजेच्या प्रकाशात चकाकत असते. तसेच हे कारंजे खूपच आकर्षक दिसत आहेत.
डॉल्फिनच्या आकर्षक शिल्पासह उभारण्यात आलेला कारंजा दिवसा तसेच रात्रीच्या प्रकाशात अधिकच देखणा दिसत असून चौकाच्या सौंदर्यात भर घालत आहे. सध्या हे डॉल्फिन शिल्प या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारक व पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मार्गावरून प्रवास करणारा पर्यटक त्या ठिकाणी थांबून सेल्फी फोटोचा आनंद घेत आहे. शहराच्या पर्यावरण व पर्यटनाचा संदेश देणारे हे डॉल्फिन शिल्प उभारण्यात आले आहे. या मार्गावर बसविण्यात आलेल्या पथदीपाचा प्रकाश डॉल्फिन शिल्पावर पडत असल्यामुळे ते अधिकच शोभून दिसते. या शिल्पाचे अजूनही काही काम शिल्लक आहे.
आमदार निलेश राणे यांनी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांना शहराच्या सौंदर्यकरणाबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नगराध्यक्षा सौ. बांदेकर यांना ही संकल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी शहरात हा सौदर्दीकरणाचा अनोखा उपक्रम राबविला. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे. शहराचे सुशोभिकरण, स्वच्छता आणि आधुनिक विकासकामांच्या माध्यमातून कुडाळ शहर आकर्षक व पर्यटनपूरक बनविण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे एस. एन. देसाई चौकाला एक नवे आकर्षण लाभले असून शहराच्या सौंदर्यात निश्चितच मोलाची भर पडली आहे.