घाटीवडे-बांबर्डे मार्गावर चिखलाचे साम्राज्य; नागरिकांचा संताप अनावर

दोडामार्ग : तिलारी-वीजघर राज्यमार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू असले, तरी हे काम नियमानुसार आणि दर्जेदार होत आहे का? असा गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पावसाळा तोंडावर आला तरी ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवला आहे. परिणामी वळवाच्या एका सरीनेच या राज्य मार्गावरील घाटीवडे ते बांबर्डे दरम्यान रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे आणि ठेकेदाराच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा संतापजनक आरोप ग्रामस्थांतून होत आहे.
दोडामार्ग-वीजघर राज्यमार्गावरील काँक्रीटीकरणाच्या कामाचा बोजवारा उडाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषतः तिलारी ते वीजघर मार्गावरील घाटिवडे आणि बांबर्डे परिसरात रविवारी झालेल्या अवकाळी पावसानंतर रस्त्याची अक्षरशः चिखलमय अवस्था झाली. रस्त्यावर सर्वत्र चिखल पसरल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काम सुरू असल्याच्या नावाखाली ठेकेदाराने रस्ता मोठ्या प्रमाणात खोदून ठेवला आहे; मात्र प्रत्यक्ष कामाचा वेग अत्यंत संथ आहे. आवश्यक मनुष्यबळाचा अभाव, यंत्रसामुग्रीची कमतरता आणि नियोजनशून्य कामकाज यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रस्त्याचे खोदकाम करून ते तसेच उघडे टाकल्याने पावसाचे पाणी साचून संपूर्ण मार्ग दलदलीत बदलला आहे. रविवारी झालेल्या पावसानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. घाटिवडे-बांबर्डे मार्गावर वाहनांची अक्षरशः कोंडी झाली होती. चिखलातून मार्ग काढताना चारचाकी वाहनचालकांची मोठी दमछाक झाली, तर दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी दुचाकी घसरून किरकोळ अपघात घडल्याच्या घटनाही समोर आल्या. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही प्रशासन आणि संबंधित विभाग पूर्णपणे ढिम्म असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. कामाचा दर्जा, सुरक्षा उपाययोजना आणि वाहतुकीची पर्यायी व्यवस्था याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले आहे. रस्ता विकासासाठी आहे की नागरिकांना वेठीस धरण्यासाठी? असा संतप्त सवाल आता वाहनधारक आणि स्थानिक ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.