“इन्सुलीत ‘ओंकार’ हत्तीचा धुमाकूळ; हल्ल्यात म्हैस ठार, वासरू गंभीर जखमी!”

बांदा : इन्सुली आणि वाफोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या ‘ओंकार’ हत्तीने आता पाळीव प्राण्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. इन्सुली-कुडव टेंब येथील एका बागेत बांधून ठेवलेल्या म्हशीवर हत्तीने जीवघेणा हल्ला करत तिला ठार केले, तर तिच्या वासराला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात संबंधित शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. 
       इन्सुली कुडव टेंब येथील गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या उत्कर्षा लक्ष्मण कुडव यांनी शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे आपली म्हैस आणि वासरू बागेत बांधून ठेवले होते. रविवारी सकाळी कुडव हे बागेत गेले असता, त्यांना म्हैस मृत अवस्थेत आणि वासरू रक्ताळलेल्या, गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. घटनास्थळी हत्तीच्या पावलांचे ठसे आणि त्याचा वावर स्पष्ट दिसत असल्याने, हा हल्ला ‘ओंकार’ हत्तीनेच केल्याचे निष्पन्न झाले. ‘ओंकार’ हत्ती गेल्या काही दिवसांपासून बांदा, इन्सुली, वाफोली आणि डेगवे परिसरात सातत्याने वावरत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने बांदा आणि वाफोली येथे उभ्या असलेल्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. त्यानंतर आता थेट पाळीव जनावरांवर हल्ला केल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनरक्षक पाटील यांच्यासह वनखात्याच्या पथकाने स्थानिकांच्या मदतीने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी करून रीतसर पंचनामा केला. कुडव यांचे या हल्ल्यात तब्बल 1 लाख रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांना तात्काळ शासकीय भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, सदा राणे आणि स्वागत नाटेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन कुडव कुटुंबाला धीर दिला. वन विभागाने या हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ ठोस पावले उचलावीत, अशी मागणी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी केली आहे.