देवगडात पहिल्याच पावसात रस्ते चिखलमय, गटारे तुंबली; नागरिक त्रस्त ; मान्सूनपूर्व पावसाची एंट्री धडाक्यात

देवगड तालुक्यात रविवारी पहाटे साडेतीन वाजल्यानंतर विजांचा कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पहिल्याच
पावसाने देवगड व जामसंडे शहरातील अपूर्ण, दुर्लक्षित आणि निकृष्ट दर्जाच्या विकासकामांचा फज्जा उडविला. काही भागात गटारांची साफसफाई न झाल्याने अनेक भागांत पाणी साचले. तर मोठ्या प्रमाणावर गाळ रस्त्यावर आल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. सायंकाळच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास वीज वितरण विभागाला यश आले. दरम्यान, या पावसामुळे सकाळच्या सत्रात वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे गेले अनेक दिवस उष्णतेने हैराण झालेल्या देवगडवासीयांना काहीसा दिलासा मिळाला होता.
देवगड तालुक्यात रविवारी पहाटेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. देवगड-निपाणी महामार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने पावसामुळे काही भागात चिखलमय परिस्थिती निर्माण झाली होती. तर दाभोळे येथे एकपदरी रस्ता अर्धवट अवस्थेत असून पर्यायी बाजूचा कच्चा रस्ता चिखलमय झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. जामसंडे शहरातील अनेक बंदिस्त गटारांच्या मुखावर प्लास्टिक व कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा थांबला होता. त्यामुळे जामसंडे फाटक क्लास परिसर तसेच सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून नागरिकांची गैरसोय झाली. या प्रकाराबाबत नागरिकांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करतानाच नगरपंचायत प्रशासनाने तातडीने नालेसफाईची मोहीम हाती घेतली. जामसंडे-नेनेनगर येथे नुकतेच बांधण्यात आलेले गटार पहिल्याच पावसात जमीनदोस्त झाले. त्यामुळे या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरातील काही भागातील गटारेही तुंबली होती. देवगड कॉलेज रोड परिसरातील मेडिकलसह काही दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे किरकोळ नुकसान झाले.