सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याची
गंभीर दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात वारंवार वीज खंडित होणार नाही याची यंत्रणेने चोख दक्षता घ्यावी आणि मान्सूनपूर्व सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि फोन न उचलणाऱ्या अधिकाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पालकमंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्दारे ही महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी आणि शाखाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पालकमंत्र्यांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. नियोजित कामासाठी जर वीज पुरवठा खंडित करायचा असेल, तर त्याची पूर्वकल्पना प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांना देणे बंधनकारक आहे. अचानक वीज गुल झाल्यामुळे लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे महावितरणने कामकाजात पारदर्शकता ठेवून जनतेला वेळोवेळी अधिकृत माहिती दिली पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी भुमिगत वीज वाहिन्यांची उर्वरित कामे तातडीने कार्यान्वित करून वीज यंत्रणा सुरक्षित करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत महावितरणच्या सर्व अभियंत्यांनी आणि शाखाधिकाऱ्यांनी मुख्यालयात हजर राहून नागरिकांच्या संपर्कात राहावे. जनतेचे फोन वेळेवर उचलून त्यांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करावे, यामध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब खपवून घेतला जाणार नाही, असे पालकमंत्र्यांनी बजावले. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवून काम करावे आणि नागरिकांना अखंडित व सुरक्षित वीज पुरवठा देण्यासाठी अधिक जबाबदारीने कार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री राणे यांनी यावेळी केले.












