सावंतवाडी ते मुंबई… थरारक खूनप्रकरणातील आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

डिचोली तालुक्यातील चिकणे-कुडणे येथे घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणातील संशयित सागर रमेश राऊळ (वय ३४, रा. सावंतवाडी) याला डिचोली पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने अटक केली आहे. शैला संजय घाडी (वय ५८) यांचा खून करून फरार झालेल्या सागरला मीरा भाईंदर-ठाणे परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत शैला घाडी यांच्या धाकट्या मुलीशी विवाह करण्याची इच्छा संशयित सागरने व्यक्त केली होती. मात्र, या विवाहाला नकार मिळाल्याने संतप्त झालेल्या सागरने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
खून केल्यानंतर सागर घटनास्थळावरून फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी डिचोली पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली होती. संशयिताच्या हालचालींचा मागोवा घेत पथकांनी सावंतवाडी, कोल्हापूर आणि मुंबई येथे शोधमोहीम राबवली. अखेर आधुनिक तंत्रज्ञान व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
अटक केलेल्या सागर राऊळ याला मीरा भाईंदर-ठाणे येथील प्रथम श्रेणी न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी हजर करण्यात आले असून, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला डिचोली पोलिस स्थानकात आणण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.