सिंधुदुर्गातील वाहनधारकांसाठी अलर्ट; ३० जूननंतर कारवाई अटळ

सिंधुदुर्गनगरी राज्यात दिनांक १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविणे शासनाने अनिवार्य केले असून यासाठीची अंतिम मुदत ३० जून २०२६ पर्यंत आहे.
एचएसआरपी नंबर प्लेट ही विशेष सुरक्षा वैशिष्ट्यांनी युक्त असून वाहनांची अचूक ओळख पटविणे, बनावट नंबर प्लेटचा गैरवापर रोखणे, चोरी व गुन्हेगारी नियंत्रणास मदत करणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानली जाते. ३० जून २०२६ नंतर एचएसआरपी नंबरप्लेट न बसविलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तथापि अंतिम मुदतीपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर अपॉइंटमेंट बुक केलेल्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी एचएसआरपी नंबरप्लेट बंधनकारक आहे. नंबरप्लेट बसविण्यासाठी अधिकृत विक्रेता केंद्रावर पूर्वनियोजित अपॉईंटमेंट आवश्यक आहे. शेवटच्या काळात गर्दी टाळण्यासाठी वाहनधारकांनी तात्काळ नोंदणी करावी. एचएसआरपी बसविण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी वाहनधारकांनी https://transport.maharashtra. gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज व स्लॉट बुकिंग करायचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करून विहित मुदतीत एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घ्याव्यात, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे.