कासार्डेत दुचाकी चोरी; चोरटा CCTV मध्ये कैद

कणकवली : कासार्ड-आनंदनगर येथे उभी केलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. याबाबतची तक्रार राजू आत्माराम कदम (रा. कासार्डे, धुमाळवाडी) यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ मे रोजी पहाटे ३.१८ वाजण्याच्या सुमारास घडली. यातील चोरटा तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
राजू कदम हे कासार्डे धुमाळवाडी येथे राहतात. ४ मे रोजी रात्री ९ वा. च्या सुमारास ते दुचाकी (एमएच-०७/ओडी-१७४९)
घेऊन आपल्या घरी जात होते. दुचाकीतील पेट्रोल संपत आल्याने ते कासार्डे येथील पोकळे पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरण्यासाठी आले. त्यावेळी पंपावर पेट्रोल उपलब्ध नव्हते. त्यामुळे कदम यांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी पेट्रोल पंपालगत राहणारे त्यांचे मित्र सचिन नर यांच्या घरासमोरील अंगणात उभी केली. त्यानंतर सचिन नर यांनी राजू कदम यांना आपल्या दुचाकीवरून कासार्ड-धुमाळवाडी येथे सोडले.
५ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राजू कदम यांचा मुलगा रितेश हा सचिन नर यांच्या अंगणात उभी केलेली दुचाकी आणण्यासाठी गेला असता, त्याला तिथे दुचाकी आढळून आली नाही. त्यावेळी त्याने आपले वडील राजू कदम यांना कॉल करून दुचाकी तेथे नसल्याची माहिती दिली. त्यानंतर सचिन नर यांच्या घरासमोर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले असता, ५ मे रोजी पहाटे ३.१८ च्या सुमारास ३० ते ३५ वयोगटातील एका अनोळखी व्यक्तीने डुप्लिकेट चावीने दुचाकी सुरू करून तळेरेच्या दिशेने निघून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे ही दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद राजू कदम यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार चंद्रकांत झोरे करत आहेत.