मद्यपान करून एसटी कर्मचाऱ्यांची तुफान फ्रीस्टाईल हाणामारी..

श्रीवर्धन आगारात दोन एसटी कर्मचाऱ्यांची आगारातच तुफान फ्रीस्टाईल हाणामारी करण्याची घटना घडली. या प्रकारामुळे स्थानकात एकच खळबळ माजली. मारामारी
करणाऱ्यांपैकी एकजण महामंडळाचा तर दुसरा खाजगी वाहनचालक आहेत. या दोघांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आगार प्रमुख शर्वरी लांजेकर यांनी दिले आहेत. या हाणामारीमुळे आगारातील एसटी वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.
उपलब्ध माहितीनुसार श्रीवर्धन एसटी स्थानकात चालक, वाहकांसाठी विश्रांतीगृह बांधण्यात आले आहे. या विश्रामगृहात महामंडळाचा नियमित चालक आर.डी.मंगे आणि खाजगी चालक लहू चव्हाण हे वास्तव्य करुन आहेत. यामधील मंगे हे चार दिवसापासून रजेवर आहेत तर चव्हाण यांना व्यवस्थापनाने नोटीस बजावली आहे. मात्र या दोघांचे विश्रामगृहातच वास्तव्य आहे. दोघांमध्ये वाद विवाद झाले.
ही मारामारी इतकी जोरात झाली की चव्हाण यांने मंगे यांना खाली पडून त्यांचा गळाच दाबायला सुरुवात केली. ही घटना पाहून उपस्थित प्रवाशांनी या दोघांची भांडणे सोडवून आगारप्रमुखांसमोर हजर केले. या घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आलेली नाही.