आता होणार, नौकांची घुसखोरी आणि अवैध मासेमारी रोखण्यास ड्रोनचा वापर

महाराष्ट्र राज्याच्या समुद्र क्षेत्रात होणारी परप्रांतीय नौकांची घुसखोरी आणि अवैध मासेमारी रोखण्यासाठी आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे. राज्यातील सात सागरी जिल्ह्यांसाठी नऊ ड्रोन मिळणार असून, रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा व साखरीनाटे किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन मिळणार आहेत. ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेन्टनन्स कार्यप्रणालीचे नियंत्रण कक्ष मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात सुरू झाले आहे. रत्नागिरीतील ड्रोनच्या गस्तीचा प्रारंभ 9 जानेवारी रोजी भाट्ये समुद्र किनारी होणार आहे.
महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमच्या सन 2021 च्या सुधारित कायद्यानुसार मासेमारीचे नियमन केले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील पालघर येथील शिरगाव, ठाणेतील उत्तन, सिंधुदुर्गतील देवगड किनाऱ्यासाठी प्रत्येकी एक, मुंबई उपनगरातील गोराई, ससूनडॉक, रायगडातील रेवदंडा व श्रीवर्धन, रत्नागिरीतील मिरकरवाडा व साखरीनाटे किनाऱ्यासाठी दोन ड्रोन उपलब्ध होणार आहेत.
मुंबईतील मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात या ड्रोनचा नियंत्रण कक्ष 9 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते सुरू होणार आहे. याच दिवशी सकाळी 9.45 वाजता ड्रोन उडवण्याचा प्रारंभ रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनारी होणार आहे.