चिपळुण प्रदर्शनात बकासूर बैल ठरला लक्षवेधी…

चिपळुण मध्ये सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विशेषकरून पशुधन प्रदर्शनाकडे नागरिक आणि विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले आहे. राज्यात प्रसिद्ध बकासूर नावाच्या बैलाचे प्रदर्शनात आगम झाले. त्याला पाहण्यासाठी गर्दी उसळली. सुरक्षेच्या गराड्यात आलेला बकासूर प्रदर्शनात लक्षवेधी ठरला. चिपळूण नागरी पतसंस्था व वाशिष्ठी मिल्कच्यावतीने पाच दिवस चिपळुणातील सावरकर मैदानावर कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी देखील सकाळी चिपळूण व जिल्हाभरातील लोकांनी या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद दिला. विविध प्रकारच्या बैलगाड्यांचे प्रसिद्ध बैल, गजा रेडा, वेगवेगळ्या प्रकारच्या म्हशी, गायी या प्रदर्शनात लक्षवेधी ठरत आहेत. याशिवाय उंट, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, पक्षी, शोभेचे उंदीर लोकांचे आकर्षण ठरत आहेत. पाच पायांची गायदेखील या प्रदर्शनात आहे. या शिवाय या ठिकाणी केलेले कोकणी घर, गोठा, मचाण लक्ष वेधून घेत आहे.
वारकऱ्यांनी महोत्सवात रिंगण धरले आणि विठ्ठल नामाचा गजर केला. त्यानंतर पशुधन स्पर्धा झाली. महोत्सवात पशुधन स्पर्धाही घेण्यात आली. ९ जानेवारीपर्यंत प्रदर्शनामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.