
सावंतवाडी : प्रमोद जठार यांनी आपल्या आमदारकीचा मान भाजपच्या नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना समर्पित करत पुढील सहा वर्षे कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. “नेत्यांच्या आशीर्वादाने जनहितार्थ काम करत सरकारचा दुवा बनून कोकणातील उरलेला बॅकलॉग भरून काढणार,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित जंगी स्वागत सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हार, पुष्पगुच्छ देत त्यांचे उत्साहात स्वागत केले.
जठार म्हणाले, “देशात भाजपला मिळालेलं यश हे कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीचं आणि शंभर वर्षांच्या त्यागाचं फळ आहे. माझ्या पदाचा उपयोग पक्ष संघटना आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करण्यावर माझा भर राहील.” मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष, खासदार, पालकमंत्री आणि जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून पालघर ते सिंधुदुर्ग असा समन्वय साधत काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दोन ठिकाणी झालेल्या स्वागतावरून गटबाजीच्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी ठामपणे सांगितले, “आमच्यात कोणतेही गट नाहीत, भाजप हाच आमचा गट आहे. राष्ट्र प्रथम हा विचार जपणारे आम्ही कार्यकर्ते आहोत.”
कोकणातील बेरोजगारी हा चिंतेचा विषय असून स्थानिक तरुण-तरुणींना रोजगारासाठी बाहेर जावे लागू नये, यासाठी उद्योग व रोजगारनिर्मितीवर विशेष भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. “येत्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती झालेली दिसेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विरोधकांवर टोला लगावत “लवकरच सगळेच भाजपात येऊन जयघोष करताना दिसतील,” असेही ते म्हणाले.
या स्वागत सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, भाजप सरचिटणीस महेश सारंग यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते










