आमदार निलेश राणेंच्या हस्तक्षेपाला यश; पावशीत दुभाजक उभारणी पूर्ण

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथील सर्विस रोडला दुभाजक नसल्याने निर्माण झालेल्या अपघाताच्या धोक्याची गंभीर दखल घेत कुडाळ-मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार Nilesh Rane यांनी प्रशासनाला दिलेले आदेश अखेर अमलात आले आहेत. संबंधित महामार्ग प्रशासन आणि ठेकेदाराने तात्काळ हालचाल करत या ठिकाणी दुभाजक बसवण्याचे काम पूर्ण केल्याने पावशी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नुकतीच कुडाळ येथे आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रशासनाची महत्वपूर्ण आमसभा पार पडली होती. या आमसभेत पावशी येथील ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्गावरील सर्विस रोडच्या कामातील त्रुटींबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. विशेषतः दुभाजक नसल्यामुळे वाहनांची धोकादायक वर्दळ सुरू होती आणि अपघातांची शक्यता दिवसेंदिवस वाढत होती.
ग्रामस्थांची कैफियत शांतपणे ऐकून घेतल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी या विषयाची तातडीने गंभीर दखल घेतली. आमसभेतच त्यांनी संबंधित महामार्ग प्रशासन आणि ठेकेदाराला स्पष्ट शब्दांत फटकारले. “जनतेचा जीव धोक्यात घालू नका.” असा इशारा देत कोणताही विलंब न करता तात्काळ दुभाजक बसवण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
आमदारांच्या स्पष्ट निर्देशांनंतर प्रशासनानेही तत्काळ हालचाल केली आणि पावशी येथील संबंधित सर्विस रोडवर दुभाजक उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे या भागातील वाहतूक आता अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध झाली असून संभाव्य अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून जनतेचे प्रश्न मार्गी लावणारा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार निलेश राणे यांच्या कार्यशैलीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. “लोकप्रतिनिधी असावा तर असा,” अशा शब्दांत पावशीवासीयांनी त्यांच्या कार्यतत्परतेबद्दल आभार व्यक्त केले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरत असून भविष्यात अपघात रोखण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे नागरिकांचे मत आहे